Monday, March 31, 2008

ऊठ बा मानवा



झुंजूमुंजू झाले
आता झुंजूमुंजू झाले
अवघे चैतन्य लेवूनी
सकळ ब्रम्हांड जागले

कोंबड्याने बांग दिली
पाखरांना जाग आली
गोठ्यातली कपिलाही
पाडसाला साद घाली

डोलु लागे शेत सारे
पांघरुनी गार वारे
लाजरीच्या पानांचेही
रोमांचित रोम सारे


उमलल्या जाईजुई
वात कसा गीत गाई
वनातल्या केकीलाही
नृत्याची जडली घाई

चेतावल्या दश दिशा
उजळल्या न्हाऊनीया

दवबिंदू प्राशुनिया
निशेला चढली नशा

उठीले कण नि कण
उठीलेही नारायण
तूच बा मानवा असा
करीसी कुठे परायण

वेळ असा कुणासाठी
नाही कधी रे थांबला
कालचक्राच्या फे-यात
थांबला तो संपला....
थांबला तो संपला....

सुरेश >>>
8 April, 2008

Tuesday, March 25, 2008

बालमित्र - बालसखा


प्रिय मित्रा रे सवंगड्या
बालपणीच्या बालसख्या
असा कसा रे पडला मला
सांग तुझा रे विसर कसा

तूच दिली मज कैरी बोरे
आणि कधीतरी कांदा पोहे
तू शबरी अनं तूच सुदामा
भुलली कशी रे तुला गुलामा

जमवुनी साऱ्या आट्या-पाट्या
लंगडी-लपंडाव आणि गोट्या
कधी माळावर मुक्त हिंडलो
कळी काढुनी कधी मस्त भांडलो

बघता बघता मोठी झाले
गांव सोडूनी शहरी निघाले
नांव कीर्तिच्या नादी लागुनी
मूर्ख खेळात मग्न राहीले

प्रपंचाच्या मग गाड्याखाली
नाती आपुली धुसर झाली
वर्षामागुनी वर्षे गेली
कधी न आपुली भेट जाहली

नाही पत्र नाही चिठ्ठी
नच झाल्या कधी भेटी-गाठी
एके दिवशी तार समोर
"CHANDU IS NO MORE"

तार वाचली धरणी कापली
अश्रुंची मग नदी वाहिली
जड मनावर दगड ठेवूनी
दोन तपांनी गावची वाट पाहिली

चंदयाची मग डायरी चाळली
धक्याने घरणीलाच खिळली
चंदयाची चिता माझ्याच शहरात
हाकेच्या अंतरावर निवांत जळाली?

मैत्रिचे हे धागे सारे
विणतो कोण कोणास ठावे
काही कच्चे काही पक्के
परी गुंता मात्र शंभर टक्के

सुरेश >>>
26 March, 2008

Monday, March 24, 2008

नवीन संकल्प नव्या वर्षाचे



वर्षे संपतात भराभर अनं संकल्प मात्र भाराभर
नवीन संकल्प नव्या वर्षाचे, पूर्ण केलेत का गतवर्षीचे ?

घेता शपथ सोडणार दारूचा छंद
आणि 31 डीसेंबरला नशा करून धूंद ?

वर्ष्याचे स्वागत फटाक्याने
मग निरोप का देता दारूने ?

बरे अनं वाईट, वर्ष संपते देऊन घाईत
पण तुम्ही का पीता फक्त आठवून वाईट ?

म्हणता नवीन वर्षात लाभू दे सुखशांती
मग मध्यपान करून का पसरवता अशांती ?

देता शुभेच्छा समृध्दीच्या अनं म्हणता होवो भरभराट
अनं त्यानाच पाजून, का करता त्यांच्याही संसाराचा तळतळाट ?

मानव जन्म मोलाचा, उद्धार करा कूळाचा
घोटू नको गुळाचा, नेम नाही काळाचा

आयुष्याला जुगार मानून खेळता का भाग्याशी
प्रयत्नांची धरा कास सुखे येतील घराशी

खुशाल जगा आपापल्या परीने, एकजूटिने अनं बंधुभावाने
सार्थक करा जन्माचे अनं घड़वा भविष्य राष्ट्राचे

वर्षामागून वर्षे गेलीत संकल्पांची टींगल केलीत
कूणी पाळले कूणी मोडले.. कूणी पाळूनी पुनः तोडले

पूरे हे फसवे संकल्प आता हाती घ्या प्रकल्प
विकास घडवा देशाचा... नका आणू वीकल्प

सोडूया दारूचा नाद अनं उज्वल करू भवितव्य
जीवन घडवू सार्थ हाची संकल्प .. हाच संकल्प...

सुरेश >>>
2 January, 2008

Wednesday, March 5, 2008

ज्याची खावी पोळी त्यालाच दयावे सूळी ?

उगवतो बिचारा कणा-कणातून
पण शिक्षा भोगतो क्षणा-क्षणाला

चर-चर कापतात विळ्याने
सुकवतात उन्हाच्या ज्वाळाने

मग देतात बैलांच्या पायी
अनं तुडवून रडवतात धायी-धायी

कोंडून मारतात वेताच्या तट्यात
नाहीतर कोंबतात गोणीच्या पोटात

सडतात कांडून मुसळाने
आणि पाखडून काढतात सुपाने

भरडून दळतात जात्याने
आणि मुरडून मळतात हाताने

बुचकून डुबवतात पाण्यात
अनं ठेचून रगडतात रगड्यात

चटके देतात भाजून तव्यावर
अनं तेल ओततात जखमेवर

हावरट पाहुणा सदा उपाशी
खातो लावून तूपाशी

स्वागत करतात मीळून सोळा-सोळा
आणि समाचार घेतात बत्तीस वेळा

घेउन हा पाहुणचार, आता तरी जावे घरात...
तर जिभ म्हणते मीही उभी दारात

लोळवून लाळावून खूप मारते
अनं चोथा करून गूहेत ढकलते

मोत्यासारखा टपोरी दाणा मातीतून उगवला
अनं मातीमोल होवून शेवटी मातीतच विलीन झाला...

दाण्या-दाण्यावर लिहीलेले असते खाणा-याचे नांव
पण दाणा मात्र खात असतो यातनांचे घाव.....

सुरेश >>>>>
Jan. 24, 2008


Thursday, February 28, 2008

गोदाबाईचा दिनक्रम

रामपारी तांबड फुटलं कोंबडा आरवला
आणि गोदेचा दिनक्रम सुरु झाला

गोदेच्या जागण्याने कपिलाही उठली
अनं हंबरुन वासराला बोलाऊ लागली

गोठयात पाडसाला लुचवून आणलं
आणि लोटाभर दूध सवे काढून आणलं

डोकं चुलित घालून नळी फू-फू फुंकली
आणि थपाथपा चार भाक-या भाजल्या

कर्र-कर्र रहाटासंगे चार दुडी ओढल्या
बिगी-बिगी तुळशिला दोन फे-या काढल्या

चाय न्ह्यारी करून धनी गेलं शेताकड़ं
तेव्हा कुठं बघितलं आपल्याही तान्ह्याकड़ं

लेकिला उठवुन शाळेकड़ं धाडली
आणि मुसळ घेवून धान्याशी भांडली

थकून भागून जरा कुठं पडली
तर मेल्या कुत्र्यांनी बोंब मारली

कुठून एक सर बरसत आली रिमझीम
आणि परसात कापडं झाली ओलीचींब

जळली मेली लाकडं कधी सरली
आता कापड़ं वाळायां शेणींची पाळी ऊरली

पोरगी आली शाळेतून चार पाढे शिकून
कवतिक त्याचं केलं आपलंच अञान झाकून

रात्री उष्टे-खरकट, भांडी-कुंडी झाली
मग ओवीसंगे जात्यावर साद घाली

रात्री कुठे धरतरीवर पडाया गेली
तर मागील दारी कुठे खुडूक झाली

दिवली घेऊन खूराड्यात पाह्यलं
अरेरे... कोल्ह्याने कोंबड नागवलं

सकाळ झाली ऊगवत किरणांनी न्हाली
पण गोदाबाईला जागच नाही आली

आकाशी कु-हाड कोल्ह्याच्या दाती
कोणाचं उठंण कोणाच्या हाती

सुरेश >>>
8 March, 2008

Tuesday, February 26, 2008

समजू नको अशी पायाची ही दासी


अरे अरे कवी राजा गर्व नको करु

अभिमानी बनुन असा अढी नको धरु
तुच माझा प्राणसखा तुच माझा तारु
अविचारी बनुनीया दूर नको सारु

अरे जीवनात मी आले तुझ्या
अनं कवी लागले नांवात तूझ्या
मग कविता पहिली की कवी आधी
अशा या खुळचटाच्या का रे नादी?

तुच लावलिस मला नादे
नव्हती लागली तूझ्या मागे
मग नसेल माझ्यात रस
तर तुझा अहंकार घेऊन बस

पटत कसे नाही तुला समजावु कीती
तोडू नको अशी ही जुळलेली नाती
कवी आणी कवितेचे नाते अंग-संग
जो माझ्यात दंग मीही त्याच्या संग

नाही मी एकपति की नाही पतिव्रता
माझ्या मागे आहे हजारोंचा जथा
नसेल तूला गरज तर खूशाल जा परत
मीही नाही बसणार विरहाने झुरत

आयुष्यात आले कीती अनं गेले कीती
गणती त्याची ठेवायची माझी नाही नीती
नसेल मला बाजारभाव मला नाही हाव
पण माझे भांडवल करून खाऊ नकोस भाव

असेन मी बाजारु मला त्याची लाज नाही
आहेच मी विकावू मला त्याची तमा नाही
पण समजू नको अशी पायाची ही दासी
जरी अडकली तुझ्या लेखणीच्या घसी

सुरेश >>>>
Feb. 11, 2008

गारगोटीला लोटू नका







ऑरकूटच्या या महासागरात ....

मित्ररूपी हिरे-मोती शंख-शींपले
आणि गारगोट्यांचा साठा आहे
त्यातून हवे ते वेचायचा
तुमचा आमचा सगळ्यांचाच वाटा आहे

हिरे-मोती वेचण्यात
सगळ्यांचाच कल असतो

हाच तर
शंख-शींपले अनं
गारगोटीचा छल असतो


हिरे-मोती वेचताना
गारगोटया लोटू नका

मुल्यवान नाही म्हणून

पायदळी तुडवू नका


मूठभर हिर घेउनि
समाधानि का हो होता?
ओंजळ भरा काटोकाट
भरीला घ्या गारगोट

हिरे-मोती जतन करणे
हा तर तुमचा ह्क्क्च आहे
पण गारगोटीला हिरा बनवणे
हिच तर खरी कला आहे

गारगोटीला हिरा बनवणे
शक्य नसल्यास बनवू नका
पण दगड धोंडा समजून
मातीमोल तरी करू नका

अनं तुमच्या सारख्या कलाकारांची
या ऑरकुटवर नाही कमी
मग माझ्या सारख्या गारगोटीला
हिरा-मोती बनण्याची आहे हमी


सुरेश >>>
Dec. 13, 2007